Friday 23 December 2016

आराखडा – पूर्ण कर्ज मुक्तीचा





आज दिनांक १९ डिसेंबर २०१६. म्हणजे हे वर्ष संपण्यास फक्त १२ दिवस शिल्लक आहेत. २०१७ हे वर्ष तुम्हला कर्जमुक्तीसाठी व्हायचे असेल तर आजपासून त्याची तयारी करूया. मागील आठवड्यातील “कर्ज मुक्तीचा – संकल्प” हा लेख वाचल्यावर खूप शेतकरी बांधवांनी मला फोन करून विचारले कि, “कर्ज माफी होणार आहे का म्हणून.” मित्रांनो इथे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो कि असं काहीही होणार नाही असं मान्य करून चला. कर्ज नियोजन यातील काही घोड समज – गैरसमज आहेत. सर्वांचा असा समज आहे कि “प्रत्येकवेळी सरकार कर्ज माफी करेल व त्या कर्जाच्या यातनेतून जनता बाहेर पडेल.” पण सत्य असे आहे कि सरकारने अथवा तुमच्या कोणी मित्राने / ओळखीच्या माणसाने दिलेल्या पैश्यातून आज कर्ज फेडले तरी कर्ज करण्याच्या मानसिकते मधून तुम्ही बाहेर पडत नाही. असेच कोठूनतरी पैसे मिळतील आणि माझे कर्ज भागले जाईल या विचारांनी तुम्ही परत कर्ज कराल. मग काय दोन वर्षांनी परत ये रे माझ्या मागल्या.

आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पर्यंत कर्ज नियोजन बाबतीत तुम्ही तुमची मानसिकता सुधारत नाही तो पर्यंत “पूर्ण कर्ज मुक्ती” हा २०१७ चा संकल्प कागदावरच राहील. जर, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा संकल्प करायचा असेल तर कर्ज म्हणजे काय हे समझुन घेणे महत्वाचे आहे. आज १९ डिसेंबर २०१६ रोजी तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि ते २०१७ च्या वर्षी कसं काय संपेल बुवा याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. इथे ठामपणे संगू  इच्छितो कि एका वर्षात, “पूर्ण कर्ज मुक्ती” होणे अशक्य आहे. बघाना जगातील ७ आश्चर्या पैकी एक आश्चर्य म्हणजे आपला “ताज – महाल” जो जगातील ३ रे आश्चर्य आहे. ताज महाल काय एका रात्रीत अथवा एक वर्षात बांधून झाला होता का? नाही. त्याला बरीच वर्ष लागली. पण इथे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि “ताज महाल बांधण्यास खूप वर्ष लागली, याचा अर्थ खूप वर्षांनी तो एक दमात बांधला गेला नाही तर ताज महाल कित्येक वर्ष रोज थोडा थोडा बांधला गेला होता”. म्हणूनच तो पूर्ण झाला.

कर्जमुक्ती बाबतही काही असेच असते. एवढे मोठ्ठ कर्ज कधी फिटणार हा विचार करत राहिलो तर तुम्ही कधीच कर्ज मुक्त होऊ शकत नाही. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, “हे सगळ बरोबर आहे. पण सुरवात कोठून करायची”. यासाठी कर्ज म्हणजे काय व त्याचे प्रकार काय आहेत हे समझुन घेऊ.

कोणतीही वित्त संस्था, बँक त्यांच्या खातेदारांना त्यांच्या गरजेसाठी व्याज आकारून पैसे वापरायला देते त्याला कर्ज असे म्हणतात. इथे तीन गोष्टी खासकरून नमूद करू इच्छितो कि;

१.      हे जे पैसे तुम्हाला मिळतात हे काही खास गरजेपोटी मिळत असतात.
२.      जेवढे दिवस तुम्ही हे पैसे वापरता त्यावर बँक तुम्हाला वापरलेल्या पैश्यावर ठरलेल्या दरा प्रमाणे व्याज आकारत असते.
३.      सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या गरजेपोटी मिळालेले पैसे हे व्याजासकट परत करणे हे बंधनकारक आहे आणि हेच १००% सत्य आहे हे मनावर कोरून ठेवा.
त्यामुळे कर्ज घेतानाच गरज कोणती आहे व त्या गरजेचे महत्व काय आहे हे समजणे उचित ठरेल. चला असं समजू कि खरच तुम्हाला शेती करण्यासाठी कर्जाची गरज आहे. पण थोडं मनाला विचारा, “शेती करण्यासाठी घेतलेले पिक कर्ज कशावर खर्च झालाय”. इथे अनेक प्रकारची उत्तरे मिळतील, याच बरोबर तुम्ही किती बरोबर आहात याचे समर्थन करणारी अनेक कारणे ही समोर येतील. पण याबरोबर, “कर्ज हे व्याजासकट फेडणे बंधनकारक आहे, हे ही ध्यानात राहू दया.”
याचा अर्थ असा नाही कि कर्ज काढायचेच नाही. कर्ज काढून जर त्याचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यातून नक्की नफा होईल. तेव्हा मित्रहो, कर्ज दोन प्रकारची असतात.

१.      चांगले कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन त्यातून तुमच्या खिश्यात पैसे येत असतील तर ते चांगले कर्ज.
उदा: तम्ही जर बँकेमधून १,००,०००/- चे कर्ज ८ % वार्षिक व्याज दराने शेती जोड धंद्यासाठी घेतले तर तुम्हाला वर्षाकाठी मुद्दल सोडून रु. ८०००/- व्याजापोटी द्यावे लागतील. जर तुम्हाला मिळालेले कर्ज व्यवस्थित गुंतवले, शेतीच्या कामासाठी वापरले व त्यातून वर्षाला रु.१२०००/- चा नफा झाला तर रु.८०००/- चे व्याज फेडून रु.४०००/- चा निव्वळ नफा झाला. याला आपण चांगले कर्ज म्हणू.

२.      वाईट कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन तुमच्या खिश्यातून पैसा बाहेर काढत असेल ते वाईट कर्ज
उद: वरील उदाहरणामध्ये जे शेती जोड धंद्यासाठी मिळालेल्या कर्जातून नवीन गाडी घेतली तर नवीन पैसा तयार होणारच नाही व ते कर्ज तुमच एक ओझ होईल. अश्या अनेक प्रकारच्या कर्जाची ओझी तुम्ही तयार करत असता. मग अशी एक वेळ येते कि ते कर्जाचे ओझं म्हणजे डोंगरा एवढे वाटायला लागते. आणि मग कर्ज फेडणे शक्य नाही ही गोष्ट मनात घेऊन त्या कर्जावर तसेच बसून राहतो. पण एक गोष्ट लक्षात राहू दया, “नुसत बसण्याने जे अस्तीत्वातले डोंगरची उंची वाढत नाही; पण कर्जाचा डोंगर नक्कीच वाढत जातो”.
इथे सर्वच काही संपले असे नाही. कर्ज नियोजनाबाबतीत काही आनंदाच्याबाबी पण आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, “कर्ज नियोजणासाठी कोणतीही जादुची कांडी कि कोणतीही यशस्वी समीकरण नाही,” कर्ज नियोजनासाठी थोडा योग्य विचार व कर्ज नियोजनाच्या आराखडा महत्वाचा आहे. चांगले कर्ज नियोजन हे काय मोठ्या शास्त्रज्ञा सारखे मोठे शोध लावणे असे नाही. अगदी आजीच्या पूर्वीच्या पैसे हाताळण्याची पद्धत इतकी सोप्पं आहे. पण जरी सोप्पं वाटत असल तरी बऱ्याच वेळा साधी गोष्ट अवलंबताना खूप त्रास होत असतो. पण मला चांगले माहिती आहे कि, “कर्ज मुक्तीसाठी तुमचे पैश्याच्या व्यवस्थापणाचे विचार चांगले पाहिजेत”. अगदी साधा कर्ज मुक्तीचा आराखडा तयार करणे, विचारपूर्वक व जाणीवपूर्वक त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे होय. त्यातूनच अनेक लोक कर्ज मुक्त झाले आहेत ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे.

तेव्हा मित्रांनो एकदाका, “तुमच्या पूर्ण कर्ज मुक्तीचा” आराखडा तयार झाला कि, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा फक्त वेळेचाच भाग आहे.  


कर्ज मुक्तीचा – संकल्प



वर्ष २०१६ मधील शेवटचा महिना सुरु आहे. शेवटचे २६ दिवस शिल्लक आहेत. बहुतेक शेतकरी मित्र उस जाण्याची वाट पहात आहे. मराठी माणसाच नविन वर्ष जर पाडव्याच्या दिवसी सुरु होत असल तरी गोऱ्या लोकांच्या सवई प्रमाणे बहुतेक सर्वच जण १ जानेवारी हा दिवस नविन वर्ष म्हणून साजरा करतात. प्रत्येक नविन वर्षी साधारण वर्षाच्या पहिल्या दिवशी, जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती काहीना काही संकल्प करत असतो.

      संकल्प म्हणजे – स्वतःच्या वाईट सवयी घालवणे अथवा प्रगती करणे यासाठी स्वतः घेतलेली शपथ. जरी स्वतःच्या  प्रगती साठी शपथ घेतली असली तरी असे निदर्शनात आले आहे कि ९०% लोकांचे संकल्प पहिल्या १० दिवसातच मोडतात. असे का होते यावर अभ्यास करून त्यावर काही तोडगा काढण्याच्या ऐवजी बहुतांश जण, "नियम / संकल्प हे मोडण्यासाठीच असतात, अशी मनाची समजुत घालून विषय सोडून देतात.”

      आता नविन वर्षाचा संकल्प करणे हे शहरी लोकांच काम आहे. अशी पद्धत आपण गाव पातळीवरही करू शकतो. याबाबत आपण शेतकरी मंडळी विचार करत नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस शहरातील असो कि  गावातला, काहीना काही संकल्प करतच असतो. पण तो संकल्प अगदी आयत्या वेळेस केल्याने तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता तयार झालेली नसते.

      चला तर मग. आज हे जाणण्याचा प्रयत्न करूया कि असे का होते. अगदी साध्या शब्दात सांगायचे म्हणजे त्या संकल्पाच्या मागील उद्देश फारच डळमळीत असतो. साधारण पणे आपण खालील प्रकारांमध्ये आपले संकल्प मांडत असतो.

१.      पैश्याच्या बाबतीत.
२.      तुमचे करियर.
३.      तुमची तब्येत.
४.      तुम्हाला काही समाज सेवा करायची आहे.
५.      अध्यात्म.
६.      करमणूक इ.
तुम्ही कोणतेही संकल्प घ्या. साधारणपणे याच साच्या मध्ये मोडतात. हे सर्व संकल्प पूर्ण झाल्यास अंतिम फायदा हा तुम्हालाच होणार असतो. तरी पण तो संकल्प पूर्ण होत नाही. याचे काही खालील नमूद कारणे आहेत.

१.      नेमका उद्दिष्ट माहिती नसते.
या मध्ये तुमचा संकल्प तुम्हाला नेमके काय देणार हे माहिती नसते. उदा:- यंदाच्या वर्षी मला माझी तब्येत चांगली करायची आहे. म्हणजे नेमके काय, हेच माहिती नसल्यामुळे तुम्ही जे अनावश्यक आहे तेच करत राहता. म्हणजे तब्येत चांगली करणे म्हणजे भरपूर खाणे हे समजून अगदी उलट काम केले जाते.

२.      उद्दिष्ट अवास्तव असतात
उदाहरण घ्यायचे झाले तर, यंदाच्या वर्षी मी उच्चांकी उसाचे उत्पादन घेण्याचे ठरवले आहे. असे जर विचार / संकल्प असतील तर नक्कीच प्रॉब्लेम आहे. जर बारकाईने विचार केला तर मागील ४ वर्षात तुमचे सरासरी एकरी उत्पादन ३० तर ४० टनाचे असेल तर अचानक उच्चांकी म्हणजे १०० टनाच्या वर कसे होईल.
      काही काळ निघून जातो व हा संकल्प आवाक्याच्या बाहेर आहे समझुन सोडून दिले जातो. परत ये रे माझ्या मागल्या.

३.      सर्व संकल्प तुमची इच्छां यावर अवलंबून असतात. त्यामागे कोणतीही system किंवा एखादी कार्य पद्धती नसते.
वरील तीन कारणे आहेत ज्यामुळे संकल्प सिद्धीस जात नाही. पण याबरोबर अशी बरीच मंडळी आहेत ज्यांचे संकल्प पूर्ण होतात. तेव्हा तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहूया.
माझे शेतकरी बांधव हे नेहमीच कर्ज – सोसायटी, पिक कर्ज, तारण कर्ज, सावकारी कर्ज अश्या एक व अनेक कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात. तर मला असे वाटते कि, “ आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया.” पुढील वर्षी कर्जाच्या कचाट्यातून बाहेत पडायचे. सुरवातीला अवघड वाटेल, पण जसं जसं प्रयत्न सुरु होतील तसं खूपच सोप्पं होईल. तेव्हा मंडळी; कागद आणि पेन घ्या व खालील प्रमाणे गोष्टी मीहून काढा.
१.      कर्ज फेडी बाबतीत तुमचे नेमके काय उद्धिष्ट आहे. तुमचे आत्ताचे कर्ज कितीही असो. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरवात करावीच लागेल ना. तर उद्धिष्ट ठेऊन काम करूया. या कर्जा पैकी यंदाच्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत किती रुपयांचे कर्ज कमी करणार हे लिहून काढा.
२.      कर्ज फेडीचे उद्धिष्ट सोप्प ठेवा:- म्हणजे तुमचे एकूण कर्जापैकी ज्या कर्जासाठी तुम्ही जास्त व्याजदर देता ती कर्ज पहिला निवडा. मित्रांनो जर डोंगराच्या शिखरावर जायचे असेल तर डोंगर चढण्यासाठी पहीले पाऊल तर टाकलेच पाहिजे. तर आज कर्जमुक्तीच्या दिशेने पहीले पाऊल टाका.
३.      जो काही तुम्ही कर्जफेडीचा विडा/ संकल्प उचलला आहे त्यासाठी नुसती इच्छा न ठेवता त्यासाठी लागणारी कार्य पद्धतीने स्वीकारा.

म्हणजे काय तर तुम्हाला कोठून पैसा येणार आहे आणि त्याचे नियोजन कसे करणार यावर भर दया.
आता तुम्ही विचार करत असाल कि नविन वर्ष सुरु होण्यासठी अजून २६ दिवस आहेत. आज कशाचा संकल्प. पण मित्रांनो ज्या दिवशी आपण ठरवू तोच आपला नविन वर्षाचा पहिला दिवस. आज सर्व साखर कारखाने सुरु झालेत. थंडीचे दिवस आहेत. मार्केट मध्ये विविध रंगाची फळे आली आहेत. म्हणजे काय आपण पेरलेला व काळजी घेऊन वाढवलेला शेतमाल बाजारात आहे. म्हणजे शेतकरी मित्राकडे पैसा येत आहे. त्यामुळे मला वाटले कि आजच “कर्जफेडीची व त्यातून मुक्त होण्यासाठीचा” पाहीले पाऊल टाकण्याचा दिवस आहे.

जरा विचार करा, कर्जफेडीचा विचारच केला नाही तर तर कर्ज कधीच कमी होणार नाही. आज विचार केला नाही तर परत आहेच, ये रे माझ्या मागल्या. कर्जातून बाहेर पडावे ही तर मनापासून इच्छा असते प्रत्येकाची. पण त्या दृष्टीने प्रयत्न केला जात नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, “कर्ज हे शेतकरी बंधूच्या जीवनाचा भाग झाला आहे. कर्जा शिवायही जीवन असत कदाचित तुम्ही विसरला आहात.” जर कर्ज मुक्त झालो तर व्याजापोटी जाणारी रक्कम हा तुमचा थेट नफा आहे. एवढे ध्यानात असु द्या.
      तेव्हा आजच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कर्ज मुक्तीचा संकल्प करूया. त्यासाठी कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर कर्ज नियोजन व परतफेड योग्य प्रकारे केली तर तुमचे किती पैसे वाचू शकतात हे पुढील लेखामध्ये उदाहरणा सहित बघूया.



नोट बंदी व आर्थिक व्यवस्थापण



नमस्कार मंडळी.... मागील काही लेखांमधून तुम्हाला आलेल्या अनुभवावरून तुमचे पैश्याचे विचार कसे बनतात हे पहात आलो आहे. काय योगा योग आहे पहा.... याच दरम्यान आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक कायम आठवणीत राहणारा अनुभव मिळाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.०० वाजता आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी  ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. म्हणजे ९ नोव्हेंबर पासून या सर्व नोटा व्यवहारात चालणार नाही असे सांगितले, आणि बऱ्याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. मागील १० दिवसांमध्ये खूप चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यातील एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. गोष्ट आहे ग्रामीण भागातील. एक वयस्कर मावशी, वय साधारण ६०-६५ असेल. परिस्थिती खुपच बेताची. मावशी तशी व्यवहारी. पैसा जापुन ठेवला होता, पण घरी. थोडे थोडे साठवून मावशी कडे तब्बल रु.१,७३,०००/- होते. ते पण ५०० व १००० नोटा मधून. अचानक नोट बंदी मुळे मावशी घाबरली. पण जेव्हा सर्व गोष्टींची कल्पना आली त्यावेळी थोडी स्थिरावली. आपल्या जवळ असलेला / जमा केलेला कष्टाचा पैसा बॅंकेत जमा करून हवं तसा काढता येतो हे समजल्यावर तिने तिचा तो घरी ठेवलेला पैसा काही महिन्यापूर्वी उघडलेल्या जन-धन खात्यात भरून ठाकला व निश्चिंत झाली.

गोष्ट एकदम साधी पण भरपूर काही शिकवून जाते. प्रथम दर्शनी या नोट बंदी निर्णयाचा खुपच त्रास वाटतोय, कारण तुम्ही तुमच्या पूर्वीच्या सवयीचे सध्या गुलाम आहात. बदल हा कोणालाच सहजासहजी नको असतो. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही तुमच्या Comfort Zone मधून बाहेर पडायला तयार नसता. इथे मावशीला ह्या तिच्याकडच्या नोटा तिच्या हातातून बॅंकेच्या म्हणजे दुसऱ्या हातात देणे जड जात होते. इतके महिने बँकेत खाते असून पैसे बॅंकेत भरले नाही कारण, “त्या सर्व नोटा स्वतःच्या जवळ ठेवण्यात इतक्या वर्ष पासून तयार झालेली मानसिकता व त्यातून मिळणारे समाधान हे होय.” या उदाहरणा प्रमाणे, खूप सारे शेतकरी मित्र शेतमाल विक्रीचा पैसा घरीच ठेवण्यात समाधान मानतात. पण या मधून प्रत्येकाचे खूप मोठे नुकसान होत असते.

निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. बघा ना.... निसर्ग तुम्हाला असंख्य प्रकारची फळे देतो. नुसतं देत नाही.... तर तुम्हाला ती फळे खाण्यापासून रोखत नाही. पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि या प्रत्येक फळा सोबत तुम्हला बी पण मिळते. निसर्ग चक्र सुरक्षित राहण्यासाठी त्या फळा बरोबर मिळालेले बी जर तम्ही निसर्गात पेरले नाही तर तुम्हाला परत फळे खायला मिळण्याची शक्यता कमी आहे. पैश्याचं ही तसंच गणित असते. मिळालेल्या  पैश्यातून काही पैसा चांगले बीज म्हणून बाजूला काढला पाहिजे. पण वरील गोष्टीमध्ये सांगितलेल्या मावशी प्रमाणे नुसता बाजूला काढून उपयोग नाही तर त्याचे व्यवस्थित बिजारोपण केले पाहिजे. तरच नवीन झाड येईल. ही इतकी साधी गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकरी बांधव अनेक वर्ष करत आला आहे. उदा:- तुमच्या कडे खरीपातील  भाताचे खूपच जुने व उत्तम प्रतीचे वाण आहे. दर वर्षी भात कापणी झाल्यावर सगळ्यातच भाताचे तांदूळ न करता त्यातील काही भाग हा पुढील वर्षीसाठी बीज म्हणून ठेवला जातो. आता हे बीज जर पेरले नाही तर नवीन उगवणार कसे. जर असे प्रत्येक शेतकऱ्याने केले तर बाजारात उत्तम प्रतीचे बीज मिळणार नाही व काही वर्षांनंतर त्या प्रतीचे वाण बाजारातून नष्ट होईल. त्या प्रकारच्या तांदळाचा तुटवडा जाणवावा लागेल. नवीन बीज तयार तरी किती करणार. एका बाजूला कोणीतरी दडपून ठेवल्यामुळे ते बीज खराब होत असते व जे नवीन तयार करणार त्याची प्रत चांगली असेलच याची खात्री नाही.
निसर्ग तुम्हला आम्हाला हे सांगतो कि जे लपून ठेवलेले बीज आहे ते चलनात / वापरात आले पाहिजे. तरच नवीन उत्तम प्रतीचे बीज तयार होईल. तसेच काही गणित अर्थशास्त्र सांगते. अर्थशास्त्राचे जीवनात खूपच महत्व आहे. प्रत्येक वेळी माणसाकडे पैसा आला कि त्याला दोन मार्ग असतात. एक म्हणजे – खर्च करून टाकणे व दुसरा म्हणजे बचत करणे. भाताच्या उत्तम प्रतीच्या वाणा प्रमाणे बीज बाजूला काढून जर ते पेरलेच नाही तर नवीन भात तयार कसा होणार. तसेच बचत केलेला पैसा जर मावशी सारखा घरीच ठेवला तर तो नवीन पैसा कसा तयार करेल. हाच पैसा बँकेत ठेवला, व्यवस्थित गुंतवला तर परतावा मिळेल व पैसा वाढेल. जर हा निसर्गाने सांगितलेला मार्ग तुम्ही पाळला, चांगली बचत करून जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर तुमचे जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनात जादू होईल. तुम्ही भाताच्या चांगल्या बिजाप्रमाणे पैश्याची काळजी घ्या. बघा पैसे तुमचे एवढी काळजी घेतील कि कळत - नकळत तुम्ही वेगाने श्रीमंतीकडे वाटचाल कराल.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भलेही काळा पैसा ( म्हणजेत जे भाताचे चांगले वाण जे लोकांनी दाबून ठेवले आहे ) बाहेर काढण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, तरीही मला वाटते कि या निमित्ताने कळत - नकळत तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसाही जो तुमच्यासाठी काम करत नव्हता, तो आता काम करायला लागेल. घरी ठेवलेला पैसा चलनात येईल. प्रत्येक शेतकरी बांधवाने एवढे केले तर देशाबरोबर / तुमच्या जीवनातही अर्थक्रांती घडेल.

नोट बंदीच्या घटनेमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या Money Blueprint (आर्थिक आराखडा) मध्ये एक गोष्ट नक्की कोरली जाईल कि, “जस निसर्गाने दिलेले बीज जर पेरले नाही तर ते खराब होऊन जाईल, तसेच मिळवलेला पैसा जर गुंतवला नाही, चलनात आणला नाही तर तो ही एक ना एक दिवस खराब होईल.”


चलनात न येणाऱ्या पैश्याचे राष्ट्रीय पातळीवर खूप वेगवेगळे तोटे आहेत. या गोष्टी पर्यंत सामान्य माणसाचे विचार ही पोहचत नाही. पण तुमचा स्वतःचा पैसा जरी चलनात नसेल तर त्याचे ही तोटे खूप आहेत. त्यामुळे तुम्ही, तुमच्यासाठी तुमच्या जवळ महनतीने साठवलेला ५०० व १००० च्या नोटा चलनात आणा. म्हणजे बँकेत भरा. असे केल्याने तुमचाच फायदा आहे व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ठरवलेल्या उद्धिष्टां पर्यंत पोहोचण्यासाठी आपला खारीचा वाटा उचला.

आर्थिक यशाचा आराखडा लेख ५


आतापर्यंत आपल्या एवढ लक्षात आले आहे कि जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर प्रथम भरपूर पैसे आले पाहिजेत. आणि जर पैशाचा ओघ चांगला हवा असेल तर तुमची पैश्याबाबतची विचार पद्धती व्यवस्थित पाहिजे. ही चांगली अथवा वाईट विचार पद्धती कशी बनते या वर आपण इतके दिवस पहायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच काय कि, “तुमचा आर्थिक यशाचा आराखडा” कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच.

मागील लेखामध्ये शब्दाच्या अस्त्रामुळे तुमची Money blueprint कशी होते हे पाहीले. याच बरोबर तुम्ही काय पाहता, तुम्हाला काय अनुभव येतात यावर तुमची Money blueprint बनत असते. आयुष्यात प्रत्येक घटना ही तुमच्या मनावर आर्थिक बाबींबाबत काही विचार पक्के करत असते. मग आपण त्याच पद्धतीने वागत असतो.

चला आज, आत्ता, ताबडतोब एक प्रयोग करू. प्रत्येक वाचकाला मी विनंती करतो कि तुम्ही तुमच्या बालपणा मध्ये जा. आता थोडा विचार करा कि, “तुम्ही मोठे होत असताना तुमचे  आई - वडील पैश्याबाबत कसा विचार करत होते.” त्यांची पैश्यासंबंधी आचरण कसं होते. त्यांनी त्यांचा पैसा योग्य प्रमाणे वापरला होता का? त्यांची गुंतवणूकीची पद्धत कशी होती. ते एक चांगले गुंतवणूक दार होते कि अजिबातच गुंतवणूक करत नव्हते. जर गुंतवणूक करण्यात चांगले असतील तर त्यांची गुंतवणूक कश्यामध्ये होती? जमीन, घर, दुकान या प्रकारामध्ये गुंतवणूक केली होती कि त्यांची बँकेमध्ये Fix Deposit होती. अश्या अनेक प्रकारच्या विचारांवर थोडे बारकाईने लक्ष दया. कारण जे काही तुम्ही लहानपणापासून बघत आला असाल, तसेच तुम्ही वागत आहात. कारण तुमची विचार पद्धती तशीच बनली आहे.

प्रत्येक जीवंत प्राणी (त्यात आपण पण आलोच) हा लहानपणापासून अनुकरण करण्यात एकदम पुढे असतो. आपण ज्या गोष्टींचे अनुकरण कसा करता सवय लावून घेतो तसेच आपण घडत असतो. असे नसते तर तुमच्या गावामध्ये एक व्यक्ती, जी धंद्या मध्ये एकदम तरबेज आहे, त्या व्यक्तीची पुढची पिढी ही तशीच झाली नसती.

तात्पर्य असे कि आपण इतर बाबींप्रमाणे, पैशाच्या बाबतीत पण आईवडिलांचे / पालकांचे अनुकरण करत असतो. माझे फायनान्शीयल फिटनेसचे कार्यशाळा होतात. त्यामध्ये मी माझे स्वतःचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी मुळ कोल्हापूरचा. आम्ही लहान असल्यापासून वडिलांचा व्यवसाय होता. लेथ मशीन होते व त्यावर जॉब वर्कचे काम चालू असे. जॉबवर्कच्या कामामध्ये एकदम हाभरवंडा होता. कामगार वर्ग पण एकदम चांगला होता. पण दर ४ वर्षांनी एक मंदी लाट यायची (असे मी ऐकत आलो होतो) म्हणजे काय कि काम कमी होते. मग खर्च भागात नाहीत. मग ज्याच्याकडे scrap माल दयायचा त्याच्याकडून उधारी आणायची. पण एक गोष्ट निश्चित होती कि त्या मंदीच्या काळामध्ये पैश्याची खूपच चण - चण असायची व संपूर्ण घरामध्ये त्रासदायक वातावरण असायचे. जस जस मोठा होत गेलो, शिक्षणासाठी बाहेर पडलो. मुंबई विद्यापीठ येथून MBA पूर्ण केले. चांगली नोकरी लागली. एवढ होऊन सुद्धा मी आर्थिक दुर्बलच राहत होतो. कारण दर महिन्याला आलेला पैसा मी खर्च करून टाकत असे. आलेल्या पैश्याची गुंतवणूक करायची असते हे मी लहानपणापासून कधीच पाहीले नव्हते. मंदीच्या काळात जसे scrap वाल्याकडून उधार आणलेले पाहीले होते तसेच पगाराचे पैसे संपले कि मग पुढच्या महिन्यात देतो अश्या वायदयावर मित्रांकडून उधार घ्यायचो. आणि ह्याचा जणू एक पायंडाच पडला होता. एक दिवस या सर्व गोष्टीमुळे खुपच त्रस्त झालो होतो. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असताना सुद्धा पैश्याच्या बाबतीत मी दुर्लब कसा याचं नेहमी आश्चर्य वाटत होते. सन २००० पासून माझ्या स्वतंत्र व्यवसायामध्ये उतरलो. परत तेच. एवढे पैसे येऊन सुद्धा खिसा नेहमी रिकामाच.

अश्या वेळी माझ्या स्वतःच्या वागण्यावर बारकाईने पाहीले. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली कि पैसे कमावण्याच्या बाबतीत मी वडिलांचे उत्तम अनुकरण करत होतो पण पैसा न गुंतवणे, पैश्याचे नियोजन नीट न करणे या बाबतीत ही वडिलांचे १००% अनुकरण करत होतो. आता चूक कळाली होती. ती सुधारण्यासाठी प्रयत्नशील झालो. मंदीमुळे प्रभावित होणारे व्यवसाय या पासून लांब झालो व गुंतवणूक करायला सुरवात केली.

अश्याप्रकारे जुन्या विचारातून बाहेर पडलो व सतत वाढणाऱ्या उत्पन्नाचा धनी झालो. मित्रांनो तुम्ही जे काही ऐकता, बघता किंवा पैश्याबाबतीत एखादी घटना ही तुम्ही कोण आहात हे ठरवते. मी माझा अनुभव सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वाचकाने थोडे भुतकाळात जाऊन तपासणे  १००% आवश्यक आहे. कदाचित तुमच्या आर्थिक यशाचा आड येणारा कचरा तिथेच अडकला असेल. तो जर सापडला आणि तुमच्या मनातून साफ करून टाकला कि मग तुम्हीपण सतत वाढणाऱ्या उत्पनाचे धनी व्हाल.


Monday 12 December 2016

“शब्दांचे अस्त्र व आर्थिक यश”



हल्लीच, म्हणजे १ आठवड्यापूर्वी दसरा सण होऊन गेला. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे अपराजिता देवीची मनोभावे स्थापना करून आर्थिक यशासाठी आशीर्वाद मागितला असेलच. आता हे नक्की काय याचाच विचार करताय ना? थोडक्यात सांगायचे म्हणजे अ-पराजित. पराभव न होणारा. आर्थिक बाबींवर विजय मिळवणारा विचार. दसरा हा सणच मुळात नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवण्याचा. म्हणून या दिवशी रावणाचा वध केला जातो. लंकापती रावण तर रामाने कधीच मारला आहे. पण शेतमालाचे पडणारा भाव व शेतकऱ्यांचे वाटोळे करणारा रावण अजून जिवंत आहे. त्याचा अंत होणे आवश्यक आहे. ज्या दिवशी बळीराजा जागृक होईल व त्या रावणाचा अंत करेल तोच दिवस हा दसरा-दिवाळी असेल.

आता हा नवीन रावण कोण आणि त्याला कसे शोधायचा ? आहो मंडळी, त्याला कुठे शोधायची गरज नाही. तो तुमच्या मानत आहे. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे, पैश्याच्या प्रती नकारात्मक विचार खोडून टाकले कि आर्थिक यशाचा मार्ग मोकळा होईल. पण हे नकारात्मक विचार कोणते आणि ते कसे तयार होतात यावर जरा सविस्तर विचार करू. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, तो जे काही ऐकतो, पाहतो आणि त्याच्या बाबतीत काय काय घटना घडतात, यावर त्याची विचारसरणी तयार होत असते. जेव्हा या वरून पैश्याचे विचार घडतात, त्यालाच मी Money Blueprint म्हणतो. या तीन महत्वांच्या बाबींमधील आज, “ऐकणे किंवा शाब्दिक माऱ्यामुळे काय होते ते पाहूया.
आज आपण प्रत्येकजण आपल्या बालपणात जाऊया. जर हे वाचत असताना तुम्ही शालेय विध्यार्थी असाल, तर तुम्हाला आजूबाजूला पैश्याबद्दल काय काय ऐकु येतय ते जरा जवळून बघू. त्या सर्व विचारांपैकी खालील काही वाक्य :-

१.      पैसा हेच साऱ्या वाईटांचे मूळ आहे.
२.      पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.
३.      प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकत नाही.
४.      पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहे.
५.      पैसा काही झाडाला लागत नाही.
६.      आपल्याला परवडणार नाही.

आता तुम्ही विचार करत असाल कि, “असे नुसते विचार करून कधी श्रीमंत अथवा गरीब कसे होईल.” पण माझ्या शेतकरी बांधवांनो, “पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहेच. पण त्याला आर्थिक जोड मिळाली तर काय प्रॉब्लेम आहे का ?” पण मनाच्या श्रीमंती मधेच अडकून जातो व नेहमी म्हणत राहतो कि, “तुम्ही एकाच वेळेस श्रीमंत व धार्मिक राहूच शकत नाही.” याच मध्ये जर धार्मिक राहायचे असेल किंवा मनाने श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी पैसा बाधक आहे. त्यामुळे नकळत पैश्यापासून आपण लांब जात राहतो. याच मुळे ३-४ महिने, कधी कधी वर्षभर मेहणतीने पिकवलेला शेत माल हा दुसऱ्याच्या ताब्यात देतो. म्हणजे काय, “जेव्हा पैसा तुमच्या पैसा खिशात यायची वेळ झालेली असते तेव्हा आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो.” पण तुम्ही जे काही करत आहात याला, तुमचा काहीच दोष नाही. कारण अनेक वर्ष तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी असेच सांगताना ऐकले आहे. आपले काम शेती करणे. एवढे करून आपण विक्री कशी करणार. हेच तुमच्या मनावर घट्ट रुतून राज्य करत आहे. इथे दोन गोष्टी आहेत. मनावर रुतून राज्य करणाऱ्या भावना व खरच गरज असणारा तर्क विचार. या मध्ये जर कोणाची निवड करायची झाली तर भावनेचाच नेहमी विजय होतो. मग याच भावनांचे भांडवल करून कोणीतरी तुमच्या वर राज्य करतो. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि मग माझ्या शेतकरी बांधावा प्रती सहानुभूती दाखवली जाते.

मित्रांनो एकदाका तुम्ही “सहानुभूतीच्या” चक्रव्युहात अडकला कि नेहमी तेच आवडते आणि तुम्हाला नक्की काय पाहिजे याचा तर्क विचार कधीच करत नाही. म्हणजेच काय कि, तुम्ही जिथे आहात तिथेच योग्य आहात हे दररोज सहानुभूतीच्या माध्यमातून पटवून दिले जाते. पण दुसरे मन चांगला भाव मिळून जरा जास्त पैसे मिळाले तर किती बरे, होईल या मध्ये अडकले असते. शेवटी सहानुभूतीच बरी वाटते कारण ती सवायीची असते.

तेव्हा मित्रांनो, आत्ता पर्यंत तुमच्या लक्षात आलाच असेल कि तुमचे आर्थिक वाटोळे करणारा रावण कोण आहे? मागील लेखात सांगितल्या प्रमाणे परत इथे लिहू इच्छितो कि, “तुमच्या मनात तुमच्या सवयीच विचार ठरवतात, तुमचे विचार निर्णय घेतात. निर्णय कृती ठरवतात आणि त्या नुसार तुम्हाला त्याचे फळ मिळते.” इतकी वर्ष जे काही तुम्ही ऐकत आला आहात त्या वरूनच तुमचा आर्थिक आराखडा तयार झालेला आहे. तुमचे आर्थिक बाबतीत जे काही यश अपयश आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. जर पैश्याच्या विवंचनेतून बाहेर पडायचे असेल, किंवा आर्थिक यश मिळायचे असेल तर “ही जबाबदारी तुमची तुम्हाला स्वीकारली पाहिजे”. एकदा तुम्ही ही जबाबदारी स्वच्छेने स्वीकारली कि आयुष्य आपोआप बदलायला लागेल. आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतील. ही जबाबदारी जर सक्षम पणे पेलायची असेल तर खालील गोष्टी करा:-

१.      वरील नमूद पैश्याबद्द्लच्या नकारात्मक गोष्टी लिहून काढा.
२.      ही विचार पद्धती कोठून तयार झाली याचा विचार करा.
३.      जर ती विचार पद्धती तुमच्या आर्थिक प्रगतीला मारक असेल तर त्या पासून बाजूला व्हा.
वरील गोष्टी करत असताना तुम्ही आर्थिक बाबींमध्ये कुठे आहात आणि तुम्हाला कोठे जायचे आहे.

 (तुमचे आर्थिक यश म्हणजे काय?) याचा विचार करा. “कोठे जायचे आहे हे जो पर्यंत ठरवणार नाही, तो पर्यंत कस जायचे हे कसे समजेल.?


आज इथेच थांबू. पुढील भागात पैश्यांच्या अवती-भोवती तुम्ही जे काही पाहत आला आहात व त्यांचा तुमच्या आयुष्यवर कसा परिणाम होतो हे पुढील भागात पाहू.

Sunday 11 December 2016

नकारात्मक विचार खोडा


सर्व प्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा...नवरात्री हा सण नऊ रात्री आदिशक्तीची आराधना करण्याची आहे. पावसाळा बहुतेक संपलेला आहे, शेतातली पिके तयार होत आलेली आहेत. काही तर तयार झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी मंडळी खुशीत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते व त्या दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये भोंडला खेळला जातो. यामध्ये घागर फुंकणे हा एक प्रचलित खेळ. इतकी वर्ष हा खेळ खेळला जातो, पण तो का खेळला जातो यावर आपण कधीच चर्चा करत नाही. थोडे शोधल्यावर असे वाचनात आले कि, “अष्टमीला घागर उदाच्या धुपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.” ही गोष्ट आपण अनेक वर्ष पाहत आलो आहे व त्याचप्रमाणे अनुकरण ही करीत आलो आहे. पण असे करण्याने श्वसन मार्ग शुद्ध होतो. हे वाचले तेव्हा ही गोष्ट लक्षात आली कि अश्या अनेक गोष्टी आहे ज्या गोष्टी आपण सहजपणे; त्याचा उपयोग काय आहे हे न समझुन घेता स्वीकारतो आणि निसंकोच पणे पुढच्या पिढीला देतो.

अश्याच प्रकारे पैश्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनावर कोरले गेलेले असतात. ते विचार तुमच्यासाठी फायदा देणारे आहेत कि तोटा ह्याचा विचार आपण करत नाही. कारण तो विचार आपल्या पूर्वजांनी/ वरिष्ठांनी दिलेला असतो व तो विचार चुकीचा असूच शकत नाही हे आपण आपल्या मनाला ठामपणे सांगितेले असते. आता या ठकाणी, “आडातच नाही  तर पोहणाऱ्या कुठून येणार” ही म्हण तंतोतन खरी ठरते.

माझ्या मागील लेखामध्ये किंवा माझ्या प्रत्येक व्याखानामध्ये मी नेहमी सांगत असतो कि, “ज्या गोष्टीवर अथवा घटनेवर तुम्ही लक्ष्य केंद्रित करता, ती गोष्ट अथवा घटना तुमच्या मनाप्रमाणे होते. आपण अगदी लहानपणा पासून काचेच्या भिंगाणे काडेपेटी मधील काडी जाळण्याचा खेळ खेळलाच आहे. कोणी हा खेळ खेळला नाही तर नवलच म्हणावे लागेल. आपण हा खेळ खेळताना आपल्या आजूबाजूला वरिष्ठ मंडळींनी सांगितले कि त्या भिंगातून बाहेर पडणारा सूर्यप्रकाश जर काडीचा बिंदू जिथे ज्वलन पदार्थ (sulphar) असतो, त्याठिकाणी केंद्रित झाला नाही तर तो ज्वलन पदार्थ पेट घेणार नाही. यासाठी तुम्हाला हात न हलवता पूर्ण एकाग्र मनाने तुमच्या हातातील भिंगाणे त्या काडीवर सूर्यप्रकाश पाडावा लागेल व ते तुम्ही नक्कीच केले असेल. जरा जरी मन विचलित झाले तरी सुद्धा आपले उद्धिष्ट सध्या होत नाही.

तसेच तुम्ही जर पैसेवाल्या (श्रीमंत) माणसांप्रती मनात घृणा बाळगत असला व त्याच बरोबर “मी चांगला माणूस बनणार आहे” हे म्हणत असाल तर, तुमच्या मनावर “चांगला माणूस कधीही पैसेवाला नसतो, ही गोष्ट बिंबलेली असते.” मग मला सांगा तुमच्याकडे पैसा येईल का? आणि आलाच तर तुमचेच मन तुम्हाला सांगेल कि. “ मला तर चांगला माणूस व्हायचे आहे. त्यामुळे हा पैसा खर्च करून टाकू.” पण आपण आजूबाजूला पाहीले तर आशा अनेक व्यक्ती आहेत कि जे पैसेवाले (श्रीमंत) आहेत आणि चांगले पण आहेत. पण याचा आपण विचार करत नाही कारण असा विचार करायचा असतो हे आपल्याला माहितीच नसते.

असे पैश्याबाद्द्लचे अनेक नकारत्मक विचार हे प्रत्येकाच्या मनात ठासून भरलेले असतात. यालाच मागील लेखात म्हणल्या प्रमाणे programming असे म्हणतात. आता ह्या सर्व पैश्याबाद्द्लच्या नकारत्मक गोष्टी ज्या मनावर कोरल्यागेलेल्या आहेत त्यातूनच विचार येतात. इतकी वर्ष तुमच्या पैश्याबाद्द्लच्या विचाराने तुम्ही कार्य करत आला आहात. आज प्रत्येकाची जी काही आर्थिक स्थिती आहे ही सर्वस्वी त्याने केलेल्या विचारातून झालेल्या कृतीचे फळ आहे.

त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आर्थिक यशापेक्षा चांगले यश हवे असेल, तर तुम्ही जे काही आजपर्यंत करत आहात त्यापेक्षा वेगळी कृती केली पाहिजे. जर वेगळी किंवा लाभदायक कृती करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या फायद्याचे विचार मनामध्ये आले पाहिजेत. पण हे विचार तुमच्या प्रोग्रामिंग मधेच नसतील तर कुठून येणार. बरोबर आहे कि नाही.

अगदी सोप्या भाषेत समझुन घेऊ. समजा तुम्ही तुमच्या आवडत्या एक गाण्याची सिडी बनवून घेतली. पण सिडी बनवताना काहीतरी झाले आणि काही तुमच्या एकदम नावडतीची गाणी त्यामध्ये भरली गेली. प्रत्येक वेळी तुम्ही आवडीची गाणी ऐकण्यासाठी  ती सिडी लावाल, त्या त्या वेळी ती नावडीती गाणी तुम्हाला ऐकावीच लागतील व मन एकदम नाराज होईल. जर ह्या प्रत्येकवेळी ती सिडी बंद करून परत सुरु केली तरी तुम्हाला तेच गाणे परत ऐकावे लागेल. जर ते नावडते गाणे नको असेल तर त्या सीडीच्या आतमध्ये जाऊन ते गाणे Delete अथवा खोडून टाकावे लागेल.

आपल्या आयुष्य ही असेच आहे. जर पैश्याबाद्द्लची नकारत्मक भावना तुमच्या मनावर कोरली गेली असेल तर ती तुमच्या आयुष्यातील आर्थिक प्रगतीला बाधक आहे. त्यामुळे हे सर्व नकारत्मक विचार मनामध्ये जाऊन खोडून टाकले पाहिजेत. वरील सीडीच्या उदाहरणा मध्ये तुम्हाला हे माहिती होते कि ते नावडते गाणे कोणी व कोठे भरले होते. त्यामुळे ते नावडते गाणे त्या सिडी मधून काढून टाकणे एकदम सोपं झाले होते. तसेच तुमच्या मनामधील पैश्याबाद्द्लचा उगम कोठे झाला हे पाहणे आवश्यक ठरेल. त्या विचारांची सवय कशी लागली हे पाहणे बंधनकारक ठरेल. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती खालील तीन प्रकारांमुळे त्याची विचारसरणी घडवत वा बिघडवत असतो.

१.     ऐकणे – तुम्ही लहानपणापासून पैश्याबद्दल काय ऐकत आला आहात?
२.     बघणे – पैश्याच्या अवती भवती तुम्ही काय काय बघितले आहे?
३.     घटना – पैसा केंद्रित तुमच्या आयुष्यात कोणत्या घटना घडल्या आहेत.

वरील तिन्ही गोष्टी तुमच्या सध्याच्या विचारसरणीला कारणीभूत आहेत. तेव्हा सिडी प्रमाणे या तिन्ही गोष्टी काय आहेत हे बघून त्यातील नावडती गाणी खोडून टाकणेच बरोबर ठरेल. एकदाच ही  पैश्यांच्या प्रती (नावडती गाणी) नकारत्मक विचार खोडून टाकेल कि मग आर्थिक यशाचा मार्ग मोकळा होईल.


तेव्हा मित्रा हो, वरील तिन्ही गोष्टीकडे कसे पहायचे व त्यामधून कोणते विचार खोडून टाकायचे ते आपण पुढील लेखामध्ये सविस्तर पाहूया. तो पर्यंत नवरात्री साजरी करूया, दसऱ्या दिवशी अपराजिता देवीची मनामध्ये स्थापना करूया. तिला प्रार्थना करूया कि मला आर्थिक बाबींचा विजयी कर..

यश - पैश्याचे समीकरण


आपण आपल्या आयुष्यात जे काही पाहतो, ऐकतो हे सर्व आपल्या मनाच्या कपाटामध्ये व्यवस्थित साठवून ठेवलेले असते, ही गोष्ट आपण मागील आठवड्यात लेखामध्ये पाहिली. या सर्व साठवलेल्या गोष्टीमुळे प्रत्येकाची एक प्रकारची मानसिकता तयार झालेली असते व त्याच प्रमाणे आपण निर्णय घेतो.

जसं घर बांधण्यासाठी एक आराखड्याची (Building Blueprint) गरज असते; तसेच योग्य तेवढे पैसे कमावण्यासाठी पैश्याबद्दलची मानसिकता योग्य असावी लागते. यालाच मी आर्थिक यशाचा आराखडा म्हणजे Money Blueprint म्हणतो.

चला तर मग, मागील लेखात सांगितल्या प्रमाणे, यावेळी ही Money Blueprint कशी तयार होते. याच्याकडे थोडे बारकाईने पाहूया. त्यापूर्वी मला तुम्हाला यश आणि पैसा याबद्दल एक समीकरण सांगायचे आहे. मला माहिती आहे कि हे समीकरण तुम्हाला नक्की आवडेल.

विचार भावना कृती (Action) = रिझल्ट (Result)




हा एकमेव Formula तुम्हाला अपेक्षित यश व पैसा देऊ शकतो. म्हणजे काय की,
विचार केल्यामुळे – मनातील भावना जागृत होतात.
भावना जागृत झाल्यामुळे Action घेतली जाते, आणि
जर कृती केली (Action घेतली) तरच Result (निकाल) मिळतो.

जर आपण व्यवस्थित पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि; जी व्यक्ती कामच करत नही ती व्यक्ती विचारच करत नाही. म्हणून जर कोणी चुकीचे वागले तर आपण त्याला म्हणतोच ना, “ जरा विचार कर की लेका”

तुमचे आर्थिक यश हे तुम्ही पैश्याबद्दल कसा विचार करता, पैश्याबद्दलच्या तुमच्या भावना व ते आर्थिक यश मिळवण्यासाठी तुम्ही काय व कशी कृती करता यावर अवलंबून आहे.

थोडे सोपे कारून पाहूया, माझा एखादा लेख जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा साहजिकच खूप लोक वाचत असतील. यामधील काही फोन करतात काही सोडून देतात. तर काही लोक यापेक्षाही पुढे जाऊन मध्ये व्याख्यान ठेवायची तसदी घेतात.

माझे एक वाचक मित्र श्री. माधव चव्हाण, गाव सुस्ते, ता.पंढरपूर यांनी तसदी घेऊन माझे व्याखान आयोजित केले. हे सर्व करण्यामागे त्यांचा एकच विचार होता/ आहे कि प्रत्येक शेतकरी मित्राला आर्थिक गणित समजले पाहिजे. जर आर्थिक गणित समजले तरच शेतकरी सुखाने जगू शकतो हे त्यांना पूर्णपणे माहित आहे.

आता या घटनेकडे आपण बारकाईने पाहीले तर वरील दिलेले समीकरण किती बरोबर आहे हे आपण पाहू शकतो. अनेक लोकांनी लेख वाचला व सोडून दिला. पण श्री. चव्हाण यांनी लेख वाचताना विचार केला. त्यांच्या शेतकरी बांधवांप्रती चांगल्या भावना जागृत झाल्या याच चांगल्या भावनेने त्यांनी मला निमंत्रण देण्याचे कार्य केले. निव्वळ चांगल्या भावनेने न आठेवेठे घेता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी कार्य केले व मी सुस्ते गावात व्याखानासाठी हजर झालो.

तस पाहीले तर ही खूप छोटीशी घटना आहे. पण याचा व या सारख्या अनेक घटना आहेत ज्याचा तुमचा आर्थिक यशाशी भेट संबंध आहे. मनात तुम्ही हे कसं काय बुवा ! याबद्दल नक्कीच विचार करत असाल. याचं उत्तर असे आहे कि, जर श्री. माधव चव्हाण यांच्या मनात चांगले विचार नसते, तर इतर अनेक लोकांसारखे त्यांनी नुसतं वाचून सोडून दिले असते. पण श्री. चव्हण यांच्या मनावर आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही तरी चांगले करायची मानसिकता ही तयार होती म्हणून त्यांनी विचार करून कृती केली. याला Money Blueprint (आर्थिक आराखडा) च्या भाषेत Programming म्हणतात. या मुळे आता नवीन समीकरण कसे होईल ते पाहूया.

Programming विचार भावना कृती = रिझल्ट (Result)

programming हे आपण अनुभवलेल्या गोष्टी मुळे होत असते. त्यामुळे “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार” ही म्हण तंतोतंत बरोबर ठरते.

मुळातच माझ्या बहुतांश शेतकरी मित्रांची पैश्याबद्दलची विचार धारा ही त्यांच्या आर्थिक यशाला मारक असते. उदा. जवळ जवळ ८०% पेक्षा जास्त शेतकरी मित्र हा कर्जाच्या कचाट्यात सापडलेला असतो. आता कोणी म्हणेल कि निसर्गच साथ देत नाही तर जगण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्राला कर्जामधून बाहेर पडायचे असते, याचा कधी विचारच येत नाही. त्याच्या मनामध्ये जगण्याची हीच पद्धत आहे हे ठासून भरलेले असते.

जर कर्ज विरहीत जीवन हे तुम्हाला माहितीच नसेल तर त्याबद्दल तुम्ही कधीच विचार करणार नाही. जर हा विचारच केला नाही तर त्या दिशेने तुम्ही कधीच प्रयत्न करणार नाही आणि फक्त त्याचं मुळे तुम्ही कधीच कर्जमुक्त होणार नाही हा मात्र १००% निकाल (Result) होय. जर आपण कर्जमुक्त झालो नाही तर आपला आर्थिक बाजू कधीच सुधारणे शक्य नाही.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावर बिंबवलेल्या पैश्याबद्दलच्या विचारांवर काम करणे खूप महत्वाचे आहे. म्हणजेच काय तर डोक्यातील पैश्याबद्दलचे Program / विचार तपासून त्यामध्ये योग्य ते बदल घडवले पाहिजेत.

आता हे आपले मनातील पैश्याबाद्द्लचे विचार काय आहेत आणि बदलायचे कसे, हा विचार तुमच्या मनात येत असेल. पण त्यापूर्वी हे जे काही विचार आपल्या मनावर कोरले गेले आहेत याची सुरवात कुठून झाली यावर थोडा अभ्यास करणे महत्वाचे ठरेल.


तर याच बद्दल आपण पुढच्या लेखामध्ये सविस्तर पाहूया. तो पर्यंत नमस्कर.