Sunday 11 December 2016

आर्थिक यशाचा आराखडा लेख - १



मंडळी, सर्वप्रथम सर्वांचे आभार, सकारात्मक विचार हवा या सदराला पूर्ण महाराष्ट्रामधून फोन आले. आपल्याला हे सर्व विचार आवडले व ते किती महत्वाचे आहेत हे प्रत्येक व्यक्तीशी बोलताना माझ्या लक्षात येत होते. माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाला आर्थिक प्रगती करण्याची प्रबळ इच्छा आहे हे यावरून स्पष्ट होते.

आता तुम्ही मला सांगा, “कि नुसती इच्छा असून काय होणार आहे का..” त्या साठी तुम्हाला कार्य करणे गरजेचे आहे. पण नेमके तिथेच आपलं घोडं अडतंय आणि मग आपण असलेल्या गोष्टी वर समाधानी व्हायला लागतो. नुसतं एवढाच नाही तर आपण अनेक गोष्टीबद्दल तक्रार करायला सुरवात करतो. जसे कि, निसर्ग साथ देत नाही, शासन आमची काळजी घेत नाही. या गोष्टी योग्य कि अयोग्य या चर्चेमध्ये मला पडायचे नाही. पण मला एक सांगा कि, “जर एखादी गोष्ट मला हवी असेल तर त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील ना. आता तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच येत असेल कि मी प्रयत्नामध्ये कोठेही कमी पडत नाही, पण नशीबच साथ देत नाही याला मी काय करू…
आता इथेच आपल्या आर्थिक यशाचा नकाशा किंवा आपली आर्थिक संकल्पना आपल्याला उपयुक्त ठरते. समजायला सोपे होण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला तुमच्या रानात एक स्वतःचे घर बांधायचे आहे. हे घर बांधताना तुम्ही त्याचा एक आराखडा म्हणजे Plan बनवावा लागेल. आराखडा असेल तर प्रत्येक व्यक्तिच्या कामाला दिशा मिळेल व प्रत्येकाचे काम व्यवस्थित होऊन वेळ व पैसा दोन्हीही वाचेल.

आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी पूर्वी पासून छापल्या सारख्या मनावर कोरलेल्या असतात. त्या सर्व गोष्टी (आपल्याला माहिती असलेल्या) नेहमी आपल्याला एकदम बरोबरच वाटतात. या आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आपल्या भोवती एक सुरक्षित कवच (आपल्याला असे वाटते) बनवत असतात. आपण जर हे कवचाच्या बाहेर आलो नाही तर निश्चित आपली आर्थिक प्रगती होणारच नाही.

मित्रांनो एक लक्षात ठेवले पाहिजे कि, “आजपर्यंत जे आर्थिक यश मला मिळाले आहे त्यापेक्षा वेगळे काहीतरी केले पाहिजे.” आपण सर्व शेतकरी वर्ग. आपली आर्थिक स्थिती सुधारणे अपेक्षित असेल तर आपल्याला आपल्या रानामधून चांगले दर्जेदार पिक मिळाले पाहिजे, या पिकला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. पण याबरोबर एखाद्या पिकावर आपण किती खर्च करतो आहे हे पण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती पाहिजे.

आता मोठा प्रश्न पडला असेल ना, कि एवढ सगळ करायच कधी. एकदम सोपं आहे. एक प्रत्येक माणूस हा सवयीचा गुलाम असतो. सवय दोन प्रकारची असते. एक म्हणजे करायची सवय व दुसरी न करायची. आपण नेहमी न करायची सवयी मध्ये अडकलेलो असतो. आपल्याला एखादी गोष्ट उगाचच कठीण वाटत असते. याच एकमेव कारण म्हणजे आपल्याला जे माहिती आहे, तेच नेहमी बरोबर आहे असे आपण समझत असतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला जे बरोबर वाटते ते माझ्या साठी फायदेशीर असेलच असं नाही. उदा. अनेक माध्यमातून आपल्याला हे संगीतले आहे कि उसाचे पाचट शेतातच सरीमध्ये कुजवले तर खूप नैसर्गिक खत तयार होईल. पण आपल्या बहुतांश शेतकरी बंधूच्या मनात ही कल्पना रुचत नसावी. याच कारण आपण नेहमी हाच विचार करत आलो आहोत कि, “इतकी वर्ष आपल्या वडीलधारी मंडळींनी सांगितलेली गोष्ट खोटं कस असू शकेल”. पण जरसा विचार करूया, पाचट म्हणजे नैसर्गिक कार्ब, जर पाचट शेतातच कुजवले तर रासायनिक खत द्यायचं प्रमाण कमी लागेल. खरं तर पाचट सरी मध्ये राहिले तर पाणी पण कमी लागेल. पण पाचट सरी मध्ये राहिल्यामुळे रानाला पाणी पाजण्याचा त्रास होईल म्हणून आपण एक पळवाट काढली. पाचट जाळून टाकणे. पण याने खरोखरच माझा फायदा होतो का, याचा विचार आपण खुप कमी वेळा केला असेल. इतकी वर्ष जे सांगितले आहे तेच बरोबर समझुन करत गेलो. अश्या अनेक गोष्टी आपण शेतात करत असतो कि ज्या आपण का करतो हेच आपल्याला माहिती नसतं.

आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कि याचा आणि आर्थिक व पैसा याचा काय संबध आहे. पण जरा विचार करा कि, “आपल्या रानामधून चांगले दर्जेदार पिक आले व त्याला चांगला भाव मिळाला तरच शेतकरी चांगले पैसे मिळवू शकेल.” आपण अश्या सर्व सवयी ज्या आपल्याला बाधक आहेत त्या शोधून काढल्या आणि त्या चांगल्यासाठी बदलल्या तर मित्रहो फायदा आपलाच होणार आहे ना.
चांगला फायदा झाला तरच आपण चांगली गुंतवणूक करून आपले आयुष्य स्थिर करू शकतो. थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करूया. जर आंब्याच्या झाडाला चांगले आंबे येत नसतील तर आपल्याला त्या झाडाच्या मुळांची काळजी घ्यायला पाहिजे कि नाही. तसेच आपल्या आयुष्याच्या झाडाला चांगले आर्थिक यश हवे असेल तर आपल्या विचारांवर (पैश्याबद्दलच्या) काम केले पाहिजे. यालाच मी “आर्थिक यशाचा आराखडा (Money Blueprint) असे म्हणतो.

पुढील भाग मध्ये हा आर्थिक आराखडा आपल्या मनामध्ये कसा तयार होतो व त्याचे फायदे तोटे काय हे समजून घ्यायचे प्रयत्न करू.


3 comments: