Showing posts with label financial planners. Show all posts
Showing posts with label financial planners. Show all posts

Friday, 23 December 2016

आराखडा – पूर्ण कर्ज मुक्तीचा





आज दिनांक १९ डिसेंबर २०१६. म्हणजे हे वर्ष संपण्यास फक्त १२ दिवस शिल्लक आहेत. २०१७ हे वर्ष तुम्हला कर्जमुक्तीसाठी व्हायचे असेल तर आजपासून त्याची तयारी करूया. मागील आठवड्यातील “कर्ज मुक्तीचा – संकल्प” हा लेख वाचल्यावर खूप शेतकरी बांधवांनी मला फोन करून विचारले कि, “कर्ज माफी होणार आहे का म्हणून.” मित्रांनो इथे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो कि असं काहीही होणार नाही असं मान्य करून चला. कर्ज नियोजन यातील काही घोड समज – गैरसमज आहेत. सर्वांचा असा समज आहे कि “प्रत्येकवेळी सरकार कर्ज माफी करेल व त्या कर्जाच्या यातनेतून जनता बाहेर पडेल.” पण सत्य असे आहे कि सरकारने अथवा तुमच्या कोणी मित्राने / ओळखीच्या माणसाने दिलेल्या पैश्यातून आज कर्ज फेडले तरी कर्ज करण्याच्या मानसिकते मधून तुम्ही बाहेर पडत नाही. असेच कोठूनतरी पैसे मिळतील आणि माझे कर्ज भागले जाईल या विचारांनी तुम्ही परत कर्ज कराल. मग काय दोन वर्षांनी परत ये रे माझ्या मागल्या.

आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पर्यंत कर्ज नियोजन बाबतीत तुम्ही तुमची मानसिकता सुधारत नाही तो पर्यंत “पूर्ण कर्ज मुक्ती” हा २०१७ चा संकल्प कागदावरच राहील. जर, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा संकल्प करायचा असेल तर कर्ज म्हणजे काय हे समझुन घेणे महत्वाचे आहे. आज १९ डिसेंबर २०१६ रोजी तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि ते २०१७ च्या वर्षी कसं काय संपेल बुवा याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. इथे ठामपणे संगू  इच्छितो कि एका वर्षात, “पूर्ण कर्ज मुक्ती” होणे अशक्य आहे. बघाना जगातील ७ आश्चर्या पैकी एक आश्चर्य म्हणजे आपला “ताज – महाल” जो जगातील ३ रे आश्चर्य आहे. ताज महाल काय एका रात्रीत अथवा एक वर्षात बांधून झाला होता का? नाही. त्याला बरीच वर्ष लागली. पण इथे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि “ताज महाल बांधण्यास खूप वर्ष लागली, याचा अर्थ खूप वर्षांनी तो एक दमात बांधला गेला नाही तर ताज महाल कित्येक वर्ष रोज थोडा थोडा बांधला गेला होता”. म्हणूनच तो पूर्ण झाला.

कर्जमुक्ती बाबतही काही असेच असते. एवढे मोठ्ठ कर्ज कधी फिटणार हा विचार करत राहिलो तर तुम्ही कधीच कर्ज मुक्त होऊ शकत नाही. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, “हे सगळ बरोबर आहे. पण सुरवात कोठून करायची”. यासाठी कर्ज म्हणजे काय व त्याचे प्रकार काय आहेत हे समझुन घेऊ.

कोणतीही वित्त संस्था, बँक त्यांच्या खातेदारांना त्यांच्या गरजेसाठी व्याज आकारून पैसे वापरायला देते त्याला कर्ज असे म्हणतात. इथे तीन गोष्टी खासकरून नमूद करू इच्छितो कि;

१.      हे जे पैसे तुम्हाला मिळतात हे काही खास गरजेपोटी मिळत असतात.
२.      जेवढे दिवस तुम्ही हे पैसे वापरता त्यावर बँक तुम्हाला वापरलेल्या पैश्यावर ठरलेल्या दरा प्रमाणे व्याज आकारत असते.
३.      सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या गरजेपोटी मिळालेले पैसे हे व्याजासकट परत करणे हे बंधनकारक आहे आणि हेच १००% सत्य आहे हे मनावर कोरून ठेवा.
त्यामुळे कर्ज घेतानाच गरज कोणती आहे व त्या गरजेचे महत्व काय आहे हे समजणे उचित ठरेल. चला असं समजू कि खरच तुम्हाला शेती करण्यासाठी कर्जाची गरज आहे. पण थोडं मनाला विचारा, “शेती करण्यासाठी घेतलेले पिक कर्ज कशावर खर्च झालाय”. इथे अनेक प्रकारची उत्तरे मिळतील, याच बरोबर तुम्ही किती बरोबर आहात याचे समर्थन करणारी अनेक कारणे ही समोर येतील. पण याबरोबर, “कर्ज हे व्याजासकट फेडणे बंधनकारक आहे, हे ही ध्यानात राहू दया.”
याचा अर्थ असा नाही कि कर्ज काढायचेच नाही. कर्ज काढून जर त्याचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यातून नक्की नफा होईल. तेव्हा मित्रहो, कर्ज दोन प्रकारची असतात.

१.      चांगले कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन त्यातून तुमच्या खिश्यात पैसे येत असतील तर ते चांगले कर्ज.
उदा: तम्ही जर बँकेमधून १,००,०००/- चे कर्ज ८ % वार्षिक व्याज दराने शेती जोड धंद्यासाठी घेतले तर तुम्हाला वर्षाकाठी मुद्दल सोडून रु. ८०००/- व्याजापोटी द्यावे लागतील. जर तुम्हाला मिळालेले कर्ज व्यवस्थित गुंतवले, शेतीच्या कामासाठी वापरले व त्यातून वर्षाला रु.१२०००/- चा नफा झाला तर रु.८०००/- चे व्याज फेडून रु.४०००/- चा निव्वळ नफा झाला. याला आपण चांगले कर्ज म्हणू.

२.      वाईट कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन तुमच्या खिश्यातून पैसा बाहेर काढत असेल ते वाईट कर्ज
उद: वरील उदाहरणामध्ये जे शेती जोड धंद्यासाठी मिळालेल्या कर्जातून नवीन गाडी घेतली तर नवीन पैसा तयार होणारच नाही व ते कर्ज तुमच एक ओझ होईल. अश्या अनेक प्रकारच्या कर्जाची ओझी तुम्ही तयार करत असता. मग अशी एक वेळ येते कि ते कर्जाचे ओझं म्हणजे डोंगरा एवढे वाटायला लागते. आणि मग कर्ज फेडणे शक्य नाही ही गोष्ट मनात घेऊन त्या कर्जावर तसेच बसून राहतो. पण एक गोष्ट लक्षात राहू दया, “नुसत बसण्याने जे अस्तीत्वातले डोंगरची उंची वाढत नाही; पण कर्जाचा डोंगर नक्कीच वाढत जातो”.
इथे सर्वच काही संपले असे नाही. कर्ज नियोजनाबाबतीत काही आनंदाच्याबाबी पण आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, “कर्ज नियोजणासाठी कोणतीही जादुची कांडी कि कोणतीही यशस्वी समीकरण नाही,” कर्ज नियोजनासाठी थोडा योग्य विचार व कर्ज नियोजनाच्या आराखडा महत्वाचा आहे. चांगले कर्ज नियोजन हे काय मोठ्या शास्त्रज्ञा सारखे मोठे शोध लावणे असे नाही. अगदी आजीच्या पूर्वीच्या पैसे हाताळण्याची पद्धत इतकी सोप्पं आहे. पण जरी सोप्पं वाटत असल तरी बऱ्याच वेळा साधी गोष्ट अवलंबताना खूप त्रास होत असतो. पण मला चांगले माहिती आहे कि, “कर्ज मुक्तीसाठी तुमचे पैश्याच्या व्यवस्थापणाचे विचार चांगले पाहिजेत”. अगदी साधा कर्ज मुक्तीचा आराखडा तयार करणे, विचारपूर्वक व जाणीवपूर्वक त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे होय. त्यातूनच अनेक लोक कर्ज मुक्त झाले आहेत ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे.

तेव्हा मित्रांनो एकदाका, “तुमच्या पूर्ण कर्ज मुक्तीचा” आराखडा तयार झाला कि, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा फक्त वेळेचाच भाग आहे.  


कर्ज मुक्तीचा – संकल्प



वर्ष २०१६ मधील शेवटचा महिना सुरु आहे. शेवटचे २६ दिवस शिल्लक आहेत. बहुतेक शेतकरी मित्र उस जाण्याची वाट पहात आहे. मराठी माणसाच नविन वर्ष जर पाडव्याच्या दिवसी सुरु होत असल तरी गोऱ्या लोकांच्या सवई प्रमाणे बहुतेक सर्वच जण १ जानेवारी हा दिवस नविन वर्ष म्हणून साजरा करतात. प्रत्येक नविन वर्षी साधारण वर्षाच्या पहिल्या दिवशी, जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती काहीना काही संकल्प करत असतो.

      संकल्प म्हणजे – स्वतःच्या वाईट सवयी घालवणे अथवा प्रगती करणे यासाठी स्वतः घेतलेली शपथ. जरी स्वतःच्या  प्रगती साठी शपथ घेतली असली तरी असे निदर्शनात आले आहे कि ९०% लोकांचे संकल्प पहिल्या १० दिवसातच मोडतात. असे का होते यावर अभ्यास करून त्यावर काही तोडगा काढण्याच्या ऐवजी बहुतांश जण, "नियम / संकल्प हे मोडण्यासाठीच असतात, अशी मनाची समजुत घालून विषय सोडून देतात.”

      आता नविन वर्षाचा संकल्प करणे हे शहरी लोकांच काम आहे. अशी पद्धत आपण गाव पातळीवरही करू शकतो. याबाबत आपण शेतकरी मंडळी विचार करत नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस शहरातील असो कि  गावातला, काहीना काही संकल्प करतच असतो. पण तो संकल्प अगदी आयत्या वेळेस केल्याने तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता तयार झालेली नसते.

      चला तर मग. आज हे जाणण्याचा प्रयत्न करूया कि असे का होते. अगदी साध्या शब्दात सांगायचे म्हणजे त्या संकल्पाच्या मागील उद्देश फारच डळमळीत असतो. साधारण पणे आपण खालील प्रकारांमध्ये आपले संकल्प मांडत असतो.

१.      पैश्याच्या बाबतीत.
२.      तुमचे करियर.
३.      तुमची तब्येत.
४.      तुम्हाला काही समाज सेवा करायची आहे.
५.      अध्यात्म.
६.      करमणूक इ.
तुम्ही कोणतेही संकल्प घ्या. साधारणपणे याच साच्या मध्ये मोडतात. हे सर्व संकल्प पूर्ण झाल्यास अंतिम फायदा हा तुम्हालाच होणार असतो. तरी पण तो संकल्प पूर्ण होत नाही. याचे काही खालील नमूद कारणे आहेत.

१.      नेमका उद्दिष्ट माहिती नसते.
या मध्ये तुमचा संकल्प तुम्हाला नेमके काय देणार हे माहिती नसते. उदा:- यंदाच्या वर्षी मला माझी तब्येत चांगली करायची आहे. म्हणजे नेमके काय, हेच माहिती नसल्यामुळे तुम्ही जे अनावश्यक आहे तेच करत राहता. म्हणजे तब्येत चांगली करणे म्हणजे भरपूर खाणे हे समजून अगदी उलट काम केले जाते.

२.      उद्दिष्ट अवास्तव असतात
उदाहरण घ्यायचे झाले तर, यंदाच्या वर्षी मी उच्चांकी उसाचे उत्पादन घेण्याचे ठरवले आहे. असे जर विचार / संकल्प असतील तर नक्कीच प्रॉब्लेम आहे. जर बारकाईने विचार केला तर मागील ४ वर्षात तुमचे सरासरी एकरी उत्पादन ३० तर ४० टनाचे असेल तर अचानक उच्चांकी म्हणजे १०० टनाच्या वर कसे होईल.
      काही काळ निघून जातो व हा संकल्प आवाक्याच्या बाहेर आहे समझुन सोडून दिले जातो. परत ये रे माझ्या मागल्या.

३.      सर्व संकल्प तुमची इच्छां यावर अवलंबून असतात. त्यामागे कोणतीही system किंवा एखादी कार्य पद्धती नसते.
वरील तीन कारणे आहेत ज्यामुळे संकल्प सिद्धीस जात नाही. पण याबरोबर अशी बरीच मंडळी आहेत ज्यांचे संकल्प पूर्ण होतात. तेव्हा तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहूया.
माझे शेतकरी बांधव हे नेहमीच कर्ज – सोसायटी, पिक कर्ज, तारण कर्ज, सावकारी कर्ज अश्या एक व अनेक कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात. तर मला असे वाटते कि, “ आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया.” पुढील वर्षी कर्जाच्या कचाट्यातून बाहेत पडायचे. सुरवातीला अवघड वाटेल, पण जसं जसं प्रयत्न सुरु होतील तसं खूपच सोप्पं होईल. तेव्हा मंडळी; कागद आणि पेन घ्या व खालील प्रमाणे गोष्टी मीहून काढा.
१.      कर्ज फेडी बाबतीत तुमचे नेमके काय उद्धिष्ट आहे. तुमचे आत्ताचे कर्ज कितीही असो. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरवात करावीच लागेल ना. तर उद्धिष्ट ठेऊन काम करूया. या कर्जा पैकी यंदाच्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत किती रुपयांचे कर्ज कमी करणार हे लिहून काढा.
२.      कर्ज फेडीचे उद्धिष्ट सोप्प ठेवा:- म्हणजे तुमचे एकूण कर्जापैकी ज्या कर्जासाठी तुम्ही जास्त व्याजदर देता ती कर्ज पहिला निवडा. मित्रांनो जर डोंगराच्या शिखरावर जायचे असेल तर डोंगर चढण्यासाठी पहीले पाऊल तर टाकलेच पाहिजे. तर आज कर्जमुक्तीच्या दिशेने पहीले पाऊल टाका.
३.      जो काही तुम्ही कर्जफेडीचा विडा/ संकल्प उचलला आहे त्यासाठी नुसती इच्छा न ठेवता त्यासाठी लागणारी कार्य पद्धतीने स्वीकारा.

म्हणजे काय तर तुम्हाला कोठून पैसा येणार आहे आणि त्याचे नियोजन कसे करणार यावर भर दया.
आता तुम्ही विचार करत असाल कि नविन वर्ष सुरु होण्यासठी अजून २६ दिवस आहेत. आज कशाचा संकल्प. पण मित्रांनो ज्या दिवशी आपण ठरवू तोच आपला नविन वर्षाचा पहिला दिवस. आज सर्व साखर कारखाने सुरु झालेत. थंडीचे दिवस आहेत. मार्केट मध्ये विविध रंगाची फळे आली आहेत. म्हणजे काय आपण पेरलेला व काळजी घेऊन वाढवलेला शेतमाल बाजारात आहे. म्हणजे शेतकरी मित्राकडे पैसा येत आहे. त्यामुळे मला वाटले कि आजच “कर्जफेडीची व त्यातून मुक्त होण्यासाठीचा” पाहीले पाऊल टाकण्याचा दिवस आहे.

जरा विचार करा, कर्जफेडीचा विचारच केला नाही तर तर कर्ज कधीच कमी होणार नाही. आज विचार केला नाही तर परत आहेच, ये रे माझ्या मागल्या. कर्जातून बाहेर पडावे ही तर मनापासून इच्छा असते प्रत्येकाची. पण त्या दृष्टीने प्रयत्न केला जात नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, “कर्ज हे शेतकरी बंधूच्या जीवनाचा भाग झाला आहे. कर्जा शिवायही जीवन असत कदाचित तुम्ही विसरला आहात.” जर कर्ज मुक्त झालो तर व्याजापोटी जाणारी रक्कम हा तुमचा थेट नफा आहे. एवढे ध्यानात असु द्या.
      तेव्हा आजच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कर्ज मुक्तीचा संकल्प करूया. त्यासाठी कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर कर्ज नियोजन व परतफेड योग्य प्रकारे केली तर तुमचे किती पैसे वाचू शकतात हे पुढील लेखामध्ये उदाहरणा सहित बघूया.