आज दिनांक १९ डिसेंबर २०१६. म्हणजे हे वर्ष
संपण्यास फक्त १२ दिवस शिल्लक आहेत. २०१७ हे वर्ष तुम्हला कर्जमुक्तीसाठी व्हायचे
असेल तर आजपासून त्याची तयारी करूया. मागील आठवड्यातील “कर्ज मुक्तीचा – संकल्प”
हा लेख वाचल्यावर खूप शेतकरी बांधवांनी मला फोन करून विचारले कि, “कर्ज माफी होणार
आहे का म्हणून.” मित्रांनो इथे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो कि असं काहीही होणार नाही असं मान्य करून चला. कर्ज
नियोजन यातील काही घोड समज – गैरसमज आहेत. सर्वांचा असा समज आहे कि “प्रत्येकवेळी
सरकार कर्ज माफी करेल व त्या कर्जाच्या यातनेतून जनता बाहेर पडेल.” पण सत्य असे
आहे कि सरकारने अथवा तुमच्या कोणी मित्राने / ओळखीच्या माणसाने दिलेल्या पैश्यातून
आज कर्ज फेडले तरी कर्ज करण्याच्या मानसिकते मधून तुम्ही बाहेर पडत नाही. असेच कोठूनतरी
पैसे मिळतील आणि माझे कर्ज भागले जाईल या विचारांनी तुम्ही परत कर्ज कराल. मग काय
दोन वर्षांनी परत ये रे माझ्या मागल्या.
आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पर्यंत कर्ज
नियोजन बाबतीत तुम्ही तुमची मानसिकता सुधारत नाही तो पर्यंत “पूर्ण कर्ज मुक्ती”
हा २०१७ चा संकल्प कागदावरच राहील. जर, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा संकल्प करायचा असेल तर कर्ज म्हणजे काय हे समझुन
घेणे महत्वाचे आहे. आज १९ डिसेंबर २०१६ रोजी तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि ते
२०१७ च्या वर्षी कसं काय संपेल बुवा याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. इथे ठामपणे
संगू इच्छितो कि एका वर्षात, “पूर्ण कर्ज
मुक्ती” होणे अशक्य आहे. बघाना जगातील ७ आश्चर्या पैकी एक आश्चर्य म्हणजे आपला “ताज
– महाल” जो जगातील ३ रे आश्चर्य आहे. ताज महाल काय एका रात्रीत अथवा एक वर्षात
बांधून झाला होता का? नाही. त्याला बरीच वर्ष लागली. पण इथे ही गोष्ट पक्की लक्षात
ठेवा कि “ताज महाल बांधण्यास खूप वर्ष लागली, याचा अर्थ खूप वर्षांनी तो एक दमात
बांधला गेला नाही तर ताज महाल कित्येक वर्ष रोज थोडा थोडा बांधला गेला होता”.
म्हणूनच तो पूर्ण झाला.
कर्जमुक्ती बाबतही काही असेच असते. एवढे मोठ्ठ कर्ज
कधी फिटणार हा विचार करत राहिलो तर तुम्ही कधीच कर्ज मुक्त होऊ शकत नाही. पण तुम्हाला
प्रश्न पडला असेल कि, “हे सगळ बरोबर आहे. पण सुरवात कोठून करायची”. यासाठी कर्ज
म्हणजे काय व त्याचे प्रकार काय आहेत हे समझुन घेऊ.
कोणतीही वित्त संस्था, बँक त्यांच्या खातेदारांना
त्यांच्या गरजेसाठी व्याज आकारून पैसे वापरायला देते त्याला कर्ज असे म्हणतात. इथे
तीन गोष्टी खासकरून नमूद करू इच्छितो कि;
१.
हे जे पैसे तुम्हाला मिळतात
हे काही खास गरजेपोटी मिळत असतात.
२.
जेवढे दिवस तुम्ही हे पैसे
वापरता त्यावर बँक तुम्हाला वापरलेल्या पैश्यावर ठरलेल्या दरा प्रमाणे व्याज आकारत
असते.
३.
सर्वात महत्वाचे म्हणजे
तुम्हाला तुमच्या गरजेपोटी मिळालेले पैसे हे व्याजासकट परत करणे हे बंधनकारक आहे आणि
हेच १००% सत्य आहे हे मनावर कोरून ठेवा.
त्यामुळे कर्ज घेतानाच गरज कोणती आहे व त्या
गरजेचे महत्व काय आहे हे समजणे उचित ठरेल. चला असं समजू कि खरच तुम्हाला शेती करण्यासाठी
कर्जाची गरज आहे. पण थोडं मनाला विचारा, “शेती करण्यासाठी घेतलेले पिक कर्ज कशावर खर्च
झालाय”. इथे अनेक प्रकारची उत्तरे मिळतील, याच बरोबर तुम्ही किती बरोबर आहात याचे
समर्थन करणारी अनेक कारणे ही समोर येतील. पण याबरोबर, “कर्ज हे व्याजासकट फेडणे
बंधनकारक आहे, हे ही ध्यानात राहू दया.”
याचा अर्थ असा नाही कि कर्ज काढायचेच नाही. कर्ज
काढून जर त्याचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यातून नक्की नफा होईल. तेव्हा मित्रहो,
कर्ज दोन प्रकारची असतात.
१.
चांगले कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन त्यातून तुमच्या खिश्यात पैसे येत असतील तर ते चांगले
कर्ज.
उदा: तम्ही जर बँकेमधून १,००,०००/-
चे कर्ज ८ % वार्षिक व्याज दराने शेती जोड धंद्यासाठी घेतले तर तुम्हाला वर्षाकाठी
मुद्दल सोडून रु. ८०००/- व्याजापोटी द्यावे लागतील. जर तुम्हाला मिळालेले कर्ज व्यवस्थित
गुंतवले, शेतीच्या कामासाठी वापरले व त्यातून वर्षाला रु.१२०००/- चा नफा झाला तर रु.८०००/-
चे व्याज फेडून रु.४०००/- चा निव्वळ नफा झाला. याला आपण चांगले कर्ज म्हणू.
२.
वाईट कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन तुमच्या खिश्यातून पैसा बाहेर काढत असेल ते वाईट कर्ज
उद: वरील उदाहरणामध्ये जे
शेती जोड धंद्यासाठी मिळालेल्या कर्जातून नवीन गाडी घेतली तर नवीन पैसा तयार होणारच
नाही व ते कर्ज तुमच एक ओझ होईल. अश्या अनेक प्रकारच्या कर्जाची ओझी तुम्ही तयार
करत असता. मग अशी एक वेळ येते कि ते कर्जाचे ओझं म्हणजे डोंगरा एवढे वाटायला लागते.
आणि मग कर्ज फेडणे शक्य नाही ही गोष्ट मनात घेऊन त्या कर्जावर तसेच बसून राहतो. पण एक गोष्ट लक्षात राहू दया,
“नुसत बसण्याने जे अस्तीत्वातले डोंगरची उंची वाढत नाही; पण कर्जाचा डोंगर नक्कीच
वाढत जातो”.
इथे सर्वच काही संपले असे
नाही. कर्ज नियोजनाबाबतीत काही आनंदाच्याबाबी पण आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे,
“कर्ज नियोजणासाठी कोणतीही जादुची कांडी कि कोणतीही यशस्वी समीकरण नाही,” कर्ज
नियोजनासाठी थोडा योग्य विचार व कर्ज नियोजनाच्या आराखडा महत्वाचा आहे. चांगले कर्ज
नियोजन हे काय मोठ्या शास्त्रज्ञा सारखे मोठे शोध लावणे असे नाही. अगदी आजीच्या
पूर्वीच्या पैसे हाताळण्याची पद्धत इतकी सोप्पं आहे. पण जरी सोप्पं वाटत असल तरी
बऱ्याच वेळा साधी गोष्ट अवलंबताना खूप त्रास होत असतो. पण मला चांगले माहिती आहे
कि, “कर्ज मुक्तीसाठी तुमचे पैश्याच्या व्यवस्थापणाचे विचार चांगले पाहिजेत”. अगदी
साधा कर्ज मुक्तीचा आराखडा तयार करणे, विचारपूर्वक व जाणीवपूर्वक त्याचे काटेकोरपणे
पालन करणे हे होय. त्यातूनच अनेक लोक कर्ज मुक्त झाले आहेत ही माझ्यासाठी खूपच
आनंदाची बाब आहे.
तेव्हा मित्रांनो एकदाका, “तुमच्या
पूर्ण कर्ज मुक्तीचा” आराखडा तयार झाला कि, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा फक्त वेळेचाच भाग
आहे.