Friday, 23 December 2016

नोट बंदी व आर्थिक व्यवस्थापण



नमस्कार मंडळी.... मागील काही लेखांमधून तुम्हाला आलेल्या अनुभवावरून तुमचे पैश्याचे विचार कसे बनतात हे पहात आलो आहे. काय योगा योग आहे पहा.... याच दरम्यान आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक कायम आठवणीत राहणारा अनुभव मिळाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.०० वाजता आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी  ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. म्हणजे ९ नोव्हेंबर पासून या सर्व नोटा व्यवहारात चालणार नाही असे सांगितले, आणि बऱ्याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. मागील १० दिवसांमध्ये खूप चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यातील एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. गोष्ट आहे ग्रामीण भागातील. एक वयस्कर मावशी, वय साधारण ६०-६५ असेल. परिस्थिती खुपच बेताची. मावशी तशी व्यवहारी. पैसा जापुन ठेवला होता, पण घरी. थोडे थोडे साठवून मावशी कडे तब्बल रु.१,७३,०००/- होते. ते पण ५०० व १००० नोटा मधून. अचानक नोट बंदी मुळे मावशी घाबरली. पण जेव्हा सर्व गोष्टींची कल्पना आली त्यावेळी थोडी स्थिरावली. आपल्या जवळ असलेला / जमा केलेला कष्टाचा पैसा बॅंकेत जमा करून हवं तसा काढता येतो हे समजल्यावर तिने तिचा तो घरी ठेवलेला पैसा काही महिन्यापूर्वी उघडलेल्या जन-धन खात्यात भरून ठाकला व निश्चिंत झाली.

गोष्ट एकदम साधी पण भरपूर काही शिकवून जाते. प्रथम दर्शनी या नोट बंदी निर्णयाचा खुपच त्रास वाटतोय, कारण तुम्ही तुमच्या पूर्वीच्या सवयीचे सध्या गुलाम आहात. बदल हा कोणालाच सहजासहजी नको असतो. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही तुमच्या Comfort Zone मधून बाहेर पडायला तयार नसता. इथे मावशीला ह्या तिच्याकडच्या नोटा तिच्या हातातून बॅंकेच्या म्हणजे दुसऱ्या हातात देणे जड जात होते. इतके महिने बँकेत खाते असून पैसे बॅंकेत भरले नाही कारण, “त्या सर्व नोटा स्वतःच्या जवळ ठेवण्यात इतक्या वर्ष पासून तयार झालेली मानसिकता व त्यातून मिळणारे समाधान हे होय.” या उदाहरणा प्रमाणे, खूप सारे शेतकरी मित्र शेतमाल विक्रीचा पैसा घरीच ठेवण्यात समाधान मानतात. पण या मधून प्रत्येकाचे खूप मोठे नुकसान होत असते.

निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. बघा ना.... निसर्ग तुम्हाला असंख्य प्रकारची फळे देतो. नुसतं देत नाही.... तर तुम्हाला ती फळे खाण्यापासून रोखत नाही. पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि या प्रत्येक फळा सोबत तुम्हला बी पण मिळते. निसर्ग चक्र सुरक्षित राहण्यासाठी त्या फळा बरोबर मिळालेले बी जर तम्ही निसर्गात पेरले नाही तर तुम्हाला परत फळे खायला मिळण्याची शक्यता कमी आहे. पैश्याचं ही तसंच गणित असते. मिळालेल्या  पैश्यातून काही पैसा चांगले बीज म्हणून बाजूला काढला पाहिजे. पण वरील गोष्टीमध्ये सांगितलेल्या मावशी प्रमाणे नुसता बाजूला काढून उपयोग नाही तर त्याचे व्यवस्थित बिजारोपण केले पाहिजे. तरच नवीन झाड येईल. ही इतकी साधी गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकरी बांधव अनेक वर्ष करत आला आहे. उदा:- तुमच्या कडे खरीपातील  भाताचे खूपच जुने व उत्तम प्रतीचे वाण आहे. दर वर्षी भात कापणी झाल्यावर सगळ्यातच भाताचे तांदूळ न करता त्यातील काही भाग हा पुढील वर्षीसाठी बीज म्हणून ठेवला जातो. आता हे बीज जर पेरले नाही तर नवीन उगवणार कसे. जर असे प्रत्येक शेतकऱ्याने केले तर बाजारात उत्तम प्रतीचे बीज मिळणार नाही व काही वर्षांनंतर त्या प्रतीचे वाण बाजारातून नष्ट होईल. त्या प्रकारच्या तांदळाचा तुटवडा जाणवावा लागेल. नवीन बीज तयार तरी किती करणार. एका बाजूला कोणीतरी दडपून ठेवल्यामुळे ते बीज खराब होत असते व जे नवीन तयार करणार त्याची प्रत चांगली असेलच याची खात्री नाही.
निसर्ग तुम्हला आम्हाला हे सांगतो कि जे लपून ठेवलेले बीज आहे ते चलनात / वापरात आले पाहिजे. तरच नवीन उत्तम प्रतीचे बीज तयार होईल. तसेच काही गणित अर्थशास्त्र सांगते. अर्थशास्त्राचे जीवनात खूपच महत्व आहे. प्रत्येक वेळी माणसाकडे पैसा आला कि त्याला दोन मार्ग असतात. एक म्हणजे – खर्च करून टाकणे व दुसरा म्हणजे बचत करणे. भाताच्या उत्तम प्रतीच्या वाणा प्रमाणे बीज बाजूला काढून जर ते पेरलेच नाही तर नवीन भात तयार कसा होणार. तसेच बचत केलेला पैसा जर मावशी सारखा घरीच ठेवला तर तो नवीन पैसा कसा तयार करेल. हाच पैसा बँकेत ठेवला, व्यवस्थित गुंतवला तर परतावा मिळेल व पैसा वाढेल. जर हा निसर्गाने सांगितलेला मार्ग तुम्ही पाळला, चांगली बचत करून जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर तुमचे जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनात जादू होईल. तुम्ही भाताच्या चांगल्या बिजाप्रमाणे पैश्याची काळजी घ्या. बघा पैसे तुमचे एवढी काळजी घेतील कि कळत - नकळत तुम्ही वेगाने श्रीमंतीकडे वाटचाल कराल.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भलेही काळा पैसा ( म्हणजेत जे भाताचे चांगले वाण जे लोकांनी दाबून ठेवले आहे ) बाहेर काढण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, तरीही मला वाटते कि या निमित्ताने कळत - नकळत तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसाही जो तुमच्यासाठी काम करत नव्हता, तो आता काम करायला लागेल. घरी ठेवलेला पैसा चलनात येईल. प्रत्येक शेतकरी बांधवाने एवढे केले तर देशाबरोबर / तुमच्या जीवनातही अर्थक्रांती घडेल.

नोट बंदीच्या घटनेमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या Money Blueprint (आर्थिक आराखडा) मध्ये एक गोष्ट नक्की कोरली जाईल कि, “जस निसर्गाने दिलेले बीज जर पेरले नाही तर ते खराब होऊन जाईल, तसेच मिळवलेला पैसा जर गुंतवला नाही, चलनात आणला नाही तर तो ही एक ना एक दिवस खराब होईल.”


चलनात न येणाऱ्या पैश्याचे राष्ट्रीय पातळीवर खूप वेगवेगळे तोटे आहेत. या गोष्टी पर्यंत सामान्य माणसाचे विचार ही पोहचत नाही. पण तुमचा स्वतःचा पैसा जरी चलनात नसेल तर त्याचे ही तोटे खूप आहेत. त्यामुळे तुम्ही, तुमच्यासाठी तुमच्या जवळ महनतीने साठवलेला ५०० व १००० च्या नोटा चलनात आणा. म्हणजे बँकेत भरा. असे केल्याने तुमचाच फायदा आहे व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ठरवलेल्या उद्धिष्टां पर्यंत पोहोचण्यासाठी आपला खारीचा वाटा उचला.

1 comment: